विडणी (योगेश निकाळजे) - गायींना कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गाडीला विडणी येथील गोरक्षकांनी पकडून गाईची सुटका करून तिघांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल (शनिवार) दि.18 रोजी रात्री 9 च्या सुमारास रमजान इमाम शेख रा.आसू, बाळू मारूती शेडगे रा. तामखडा व इब्राहिम सैफन शेख रा.सरडे ता. फलटण हे तिघेजण दोन गाई व एक कालवड अशी तीन गोवंश जातीची जनावरे यांना चारा पाणी याची कोणत्याही प्रकारची सोय न करता कमी जागेमध्ये उभी करून कत्तलीसाठी महिंद्रा पिकअप (क्रमांक - MH-11 BL0449) या गाडीतून जात असताना विडणी येथील कोकरेवाडीजवळ धारकरी श्री. शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान चे गोरक्षक शरद गाडे,महेश पवार, विक्रम माने,गणेश पवार, तुषार कर्णे, सौरभ सोनवले यांनी ही गाडी पकडून फलटण पोलिस स्टेशनशी संपर्क साधला त्यानंतर पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेऊन या प्रकरणी तिघांवर जनावरांचा छळ, गोवंश हत्या बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पोलिस नाईक हरिदास दराडे यांनी फिर्याद दिली आहे. तर अधिक तपास पोलिस हवालदार अडसूळ करत आहेत.दरम्यान कत्तलसाठी घेऊन जाणाऱ्या गायींना राजाळे येथील जयवंतराव गोपालन शाळेमध्ये पाठवण्यात आले आहे