साखरवाडी पुढारी वृत्तसेवा
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाने अखेर राज्य सरकारलाही धडकी भरवली आहे. वाढत्या जनदबावानंतर आणि विविध स्तरातून येणाऱ्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडवली असून, आरोपींच्या अटकेनंतरही अनेक अनुत्तरीत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी सातत्याने होत होती. त्याची दखल घेत फडणवीस यांनी एसआयटीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज दिलेल्या माहितीनुसार विशेष तपास पथकाचे नेतृत्व एक वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी करतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अनुभवी पोलीस अधिकारी, गुन्हे अन्वेषण तज्ञ आणि न्यायवैद्यक सल्लागारांचा समावेश असणार आहे. या पथकाला सर्व संबंधित कागदपत्रे, पुरावे आणि तपास नोंदींचा सखोल अभ्यास करून वास्तव परिस्थिती उघड करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत.राज्यभरातील नागरिक, महिला संघटना आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यांचा विश्वास आहे की एसआयटीच्या चौकशीनंतर या प्रकरणातील सर्व गोष्टी प्रकाशात येतील आणि दोषींना शिक्षा होईल.
राजकीय वर्तुळात मात्र या निर्णयाचे विविध अर्थ लावले जात आहेत. काहीजण याला सरकारची “न्याय देण्याची बांधिलकी” मानत असताना, विरोधकांचा आरोप आहे की सरकारवर वाढत्या लोकरोषामुळे हा निर्णय घेण्याची वेळ आली.दरम्यान, एसआयटी स्थापन झाल्यानंतर पुढील काही दिवसांत ती फलटण येथे येऊन घटनास्थळाचा तपास करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.डॉ. संपदा मुंडे प्रकरणाने समाजातील अनेक स्तरांना हादरा दिला असून, आता एसआयटीच्या तपासातून सत्य उजेडात येण्याची सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे.


