फलटण चौफेर दि १९ सप्टेंबर २०२५
फलटण नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्याधिकारी यांना दिलेला निरोप समारंभ अतिशय भव्य, प्रेमळ आणि अद्वितीय ठरला. नुकतेच पुणे येथे बदली झालेले तत्कालीन मुख्याधिकारी श्री. निखिल मोरे यांना कर्मचाऱ्यांनी अश्रुनयनांनी निरोप दिला तर नवे मुख्याधिकारी श्री. निखिल जाधव यांचे धडाकेबाज स्वागत करण्यात आले.
नगरपालिकेच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन हा दुहेरी स्वरूपाचा सोहळा अनोख्या पद्धतीने आयोजित केला. स्वागत आणि निरोप यांचे सूर एकाच हारात गुंफून अविस्मरणीय वातावरण साकारले गेले.श्री. निखिल मोरे यांनी अवघ्या दीड वर्षांच्या कार्यकाळात अनेक उल्लेखनीय कामगिरी करून ठसा उमटवला. पालखी सोहळ्याचे यशस्वी नियोजन, अवकाळी पावसामुळे आलेल्या पूरस्थितीचे योग्य व्यवस्थापन, टाटा कमिंस सीएसआरच्या माध्यमातून नगरपालिकेच्या शाळांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न, तसेच स्वातंत्र्यदिनानिमित्त पहिल्यांदाच तिरंगा रोषणाई ही त्यांची कामगिरी विशेष कौतुकास्पद ठरली.याशिवाय, एका महिला कर्मचाऱ्याला आपल्या खुर्चीवर बसण्याचा मान देऊन दिलेला निरोप संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला. तसेच, आपल्या शेवटच्या दिवशी चार कर्मचाऱ्यांना अनुकंपा नियुक्ती देऊन तो दिवस संस्मरणीय केला.श्री. मोरे यांनी कामकाजासोबतच अधिकारी-कर्मचाऱ्यांशी मैत्रीपूर्ण व आत्मीयतेचे नाते निर्माण केले. त्यामुळे निरोपाच्या वेळी अनेकांचे डोळे पाणावले. या समारंभाला नागरिक, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते यांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोरे यांना शुभेच्छा दिल्या.