फलटण चौफेर दि ०९ सप्टेंबर २०२५
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलीस प्रशासनाने डीजेवर सक्त बंदी घालण्याचा आदेश काढला होता. मात्र, हा आदेश कागदापुरताच राहिला असून स्वतः काही पोलिसांनीच डीजेच्या तालावर ठेका धरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांत प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी शहरातील अनेक गणेश मंडळांनी डीजेचा दणदणाट केला. त्यावेळी पोलिसांनी किती मंडळांवर कारवाई केली, किती जणांवर दंड ठोठावला याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही रविवारी झालेल्या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी बँजो वाद्यासह डीजेच्या कर्णकर्कश गाण्यांवर थिरकल्याचे दृश्य नागरिकांनी अनुभवले.यापूर्वी पोलीस प्रशासनाने डीजे बंदीबाबत सर्वेक्षण केले होते. साडेआठशेहून अधिक नागरिकांनी त्यात सहभाग घेतला होता. यामध्ये तब्बल ७५ टक्के नागरिकांनी डीजेबंदीला पाठिंबा दर्शविला होता. तरीदेखील अनेक मंडळांनी डीजेचा वापर केला आणि पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले.डीजेबंदीबाबत जनतेला सक्ती करणारे आणि बंदीची अंमलबजावणी करणारे पोलीसच डीजेच्या ठेक्यावर थिरकताना दिसल्याने त्यांच्या कर्तव्यनिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणावर प्रशासनाने नेमकी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.