साखरवाडी पुढारी वृत्तसेवा
साखरवाडी परिसरात मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर सुळसुळाट झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरून फिरणाऱ्या नागरिकांना, शाळकरी मुलांना तसेच वाहनचालकांना यामुळे सतत धोका निर्माण झाला आहे.मागील महिन्यात एका दुचाकीस्वारासह पादचारी नागरिकाला कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली होती. मात्र, त्यावेळी स्थानिक सरकारी दवाखान्यात रेबीज लसीचा तुटवडा असल्याने उपचार तातडीने मिळाले नाहीत. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिकच पसरले आहे.
सध्या साखरवाडी बाजारपेठ व इतर मुख्य रस्त्यांवर २० ते २५ कुत्र्यांचे टोळके कायम फिरताना दिसत असून, मटन व चिकन दुकाने यांच्याभोवती तर त्यांचा वावर जास्त असतो. त्यामुळे नागरिकांना नेहमीच धास्तीनेच वावर करावा लागत आहे. पावसाळ्याच्या दिवसांत काही कुत्री पिसाळल्यासारखी वागत असल्याचेही चित्र दिसून आले आहे.शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना रस्त्यावर चालताना सावध राहावे लागत असून, वाहन चालकांनाही अपघाताचा धोका संभवत आहे. परिणामी साखरवाडीतील व्यापारी, शेतकरी, कामगार व नागरिक यांनी प्रशासनाने तातडीने या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
“मुलांना शाळेत पाठवताना आम्हाला सतत काळजी वाटते. पावसाळ्यात पिसाळलेल्या कुत्र्यांचा धोका अधिक असल्याने प्रशासनाने यावर लवकर कारवाई करावी,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे.