फलटण चौफेर दि १५ जुलै २०२५
भैरवनाथ यात्रा कमिटी, पिंपळवाडी साखरवाडी यांच्यातर्फे ग्रामपंचायत साखरवाडी येथे एक सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा उपक्रम राबवण्यात आला. आजच्या धकाधकीच्या आणि बदलत्या जीवनशैलीच्या काळात अंत्यविधीसाठी आवश्यक साहित्य, विशेषतः तिरडीसाठी लागणारे कडबा, बांबू इत्यादी वस्तू मिळवणे कठीण झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन भैरवनाथ यात्रा कमिटीने ग्रामस्थांच्या सेवेसाठी आधुनिक पद्धतीची स्टील तिरडी उपलब्ध करून दिली असून त्याचे आज लोकार्पण करण्यात आले.सदर लोकार्पण समारंभ ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला. यावेळी कमिटीचे सर्व पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत केलेला हा उपक्रम सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारा आहे.सदर तिरडी सार्वजनिक वापरासाठी असून, कोणत्याही कुटुंबाला अंत्यविधीसाठी साहित्याची आवश्यकता भासल्यास ग्रामपंचायतीशी संपर्क साधून या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर येणारा ताण काहीसा हलका होणार आहे.भैरवनाथ यात्रा कमिटीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, हा स्तुत्य उपक्रम इतर संस्थांसाठीही आदर्श ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.