फलटण चौफेर दि ४ जुलै २०२५
साखरवाडी ता फलटण येथील साखरवाडी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक विभागामार्फत संत ज्ञानेश्वर माऊली यांची प्रतिकात्मक पालखी अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात काढण्यात आली. परिसरात विठ्ठलनामाचा गजर आणि भगव्या पताका फडकवत विद्यार्थ्यांनी दिंडीच्या स्वरूपात शाळेच्या पटांगणातून पालखी सोहळा साजरा केला.
या भक्तिपूर्ण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साखरवाडी शिक्षण संस्थेचे संचालक राजेंद्र शेवाळे, कौशल भोसले तसेच संस्थेच्या सचिव सौ जगदाळे मॅडम यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्रींची पूजा व पालखीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात टाळ-मृदंगाच्या साथीने भक्तिगीते गात उत्स्फूर्त सहभाग घेतला. काही विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत सुंदर अभिनय करत वारकरी संप्रदायाचे दर्शन घडवले. विविध रांगोळ्या व पुष्पसजावट यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारलेला होता.कार्यक्रमाचे आयोजन शाळेचे मुख्याध्यापक चांगण सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमात शाळेचे शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, तसेच सर्व पालक बंधू-भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतीची जाणीव व भक्तिभाव जागवणारा ठरला. उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करत शाळेचे व आयोजकांचे अभिनंदन केले.