फलटण चौफेर, दि. १२ जुलै २०२५
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी माजी जलसंपदामंत्री तथा सातारा जिल्ह्याचे जेष्ठ नेते शशिकांत शिंदे यांची निवड केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली असून, राज्यातील आगामी राजकीय घडामोडींचा विचार करून शिंदे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शिंदे यांचा अनुभव, पक्षनिष्ठा, संघटन कौशल्य आणि ग्रामीण भागातील मजबूत जनसंपर्क लक्षात घेऊन त्यांना ही संधी देण्यात आल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली. राज्यभरातून अनेक कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी त्यांचे अभिनंदन केले असून, या नियुक्तीमुळे पक्ष संघटनेला नवी दिशा व गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
शशिकांत शिंदे हे सातारा जिल्ह्यातील प्रभावी नेते असून त्यांनी मंत्रीपद, आमदारपद आणि विविध राजकीय जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट होईल, असे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे.