फलटण चौफेर दि. १५ जुलै २०२५:
वारुगड ट्रेकर्स ग्रुपतर्फे आयोजित करण्यात आलेली पन्हाळा ते पावनखिंड ऐतिहासिक पदयात्रा १२ व १३ जुलै रोजी अत्यंत शिस्तबद्ध, प्रेरणादायी व उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली.शनिवारी, १२ जुलै रोजी सकाळी ६ वाजता पन्हाळगडावरील वीर बाजीप्रभू देशपांडे व हुतात्मा शिवा काशीद यांच्या स्मारकास अभिवादन करून या पदयात्रेची सुरुवात झाली. इतिहासातील स्वराज्याच्या संरक्षणासाठी लढलेल्या बाजीप्रभू, शिवा काशीद, रायाजी बांदल, बांदल सेना, जाधव सेना आदी हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण यातून जागवण्यात आली.
या ऐतिहासिक मोहिमेची रूपरेषा व ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सखोल मार्गदर्शन आयोजक सतीश नलवडे यांनी उपस्थितांना दिले. यावेळी जयवंत तांबे सर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर बाबासाहेब तावरे यांनी संपूर्ण मोहिमेत मार्गदर्शन केले. मोहीम पन्हाळगडाच्या राजदिंडी मार्गावरून सुरु झाली.या मोहिमेदरम्यान मावळ्यांनी प्रत्यक्ष शिवाजी महाराज ज्या मार्गाने गेले त्या वाटांवरून चालत वीर हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस्थळांनाही भेट दिली. शिवा काशीद यांच्या बलिदानस्थळी नमन करून, मसाई पठार, खोतवाडी, आंबेवाडी, माळेवाडी, सुकामाचा ओढा, पांढरपाणी अशी ३०-३५ किमीची ही पायवाट पार करत, पावनखिंड या पवित्र स्थळी ही मोहीम संपन्न झाली.
यात्रेदरम्यान मावळ्यांनी वसई देवीच्या पांडवकालीन मंदिरात पूजा व आरतीचा लाभ घेतला. खोतवाडी येथे स्थानिक रहिवासी योगेश खोत यांच्या घरी शिध्याची व्यवस्था होती, तर माळेवाडीत तानाजी पवार कुटुंबीयांनी अतिशय उत्तम जेवण व पाहुणचार केला. त्यांना वारुगड ट्रेकर्स ग्रुपतर्फे गौरवण्यात आले.पावनखिंडच्या दिशेने जात असताना निसरड्या पायवाटा, घनदाट जंगल, चिखल, पुराचे ओढे अशा अडथळ्यांवर मात करत मावळ्यांनी बाजीप्रभू देशपांडेंच्या त्या पवित्र स्मृतीस्थळी दर्शन घेतले. "लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे", या घोषात सहभागी शिवभक्तांचे डोळे पाणावले.शेवटी, हायकर्स ग्रुप कोल्हापूर यांनी आयोजित केलेल्या शिवशाहीर देवानंद माळी व युवा शाहीर गंधर्व माळी यांच्या शाहिरी कार्यक्रमाने वातावरण भारावून गेले. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र अशा गगनभेदी घोषात पावनखिंड साक्षात स्वराज्याची प्रेरणाभूमी बनली.
या मोहिमेत सहभागी झालेले सदस्य हे विविध वयोगटातील होते. विशेषतः प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठलराव लहाने, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांचे सहभाग हे विशेष आकर्षण ठरले. "पैसा नथिंग आहे, आरोग्यच सर्वश्रेष्ठ आहे," असे विचार त्यांनी या मोहिमेत मांडले.या संपूर्ण ऐतिहासिक मोहिमेत वारुगड ट्रेकर्स ग्रुपतर्फे बाबासाहेब तावरे, सतीश नलवडे, प्रवीण मुळीक, नितीन करे, किरण तावरे, विशाल चव्हाण, जयवंत तांबे, नवनाथ धुमाळ, सनी आवटे, अमृत कर्पे, डॉ. राहुल मदने, तात्याबा भोसले, प्रमोद शहा आदींनी अत्यंत उत्तम नियोजन व सहकार्य केले.