फलटण चौफेर, दि. १४ जुलै २०२५ –
फलटण तालुक्यातील ग्रामीण पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी संयुक्त कारवाईत अॅल्युमिनियम तार चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत चार जणांना अटक केली आहे. या कारवाईत एकूण १० लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अन्य सहा साथीदार फरार आहेत.याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी,शिक्रापूर ते कर्नाटक दरम्यान वीज टॉवर लाईनचे काम सुरु असताना, या भागातून दोन वेळा अॅल्युमिनियम तार चोरीचे प्रकार घडले होते. या संदर्भात पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार आणि पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, पोलिसांनी संशयित आरोपी धर्मराज बाळू जाधव (रा. रांजणी, ता. माण), सुरज विभीषण बेलदार (रा. सरडे, ता. फलटण), सागर संभाजी जाधव आणि रजत अंकुश मदने (दोघेही रा. राजाळे, ता. फलटण) या चार संशयतांना अटक केली. चौकशीत त्यांनी इतर फरार आरोपींची नावे उघड केली असून, त्यामध्ये सचिन संभाजी जाधव, निनाद तानाजी जाधव,रा पिंपरद, ऋषिकेश सोमनाथ मदने (रा. राजाळे) तसेच दिपक व अक्षय गोविंदा पाटील (रा. चाकण, पुणे) यांचा समावेश आहे. संशयतांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे आधीच अॅल्युमिनियम तार चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्यांपैकी काही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर मालमत्तेचे व शरीराविरुद्धचे गुन्हेही दाखल आहेत.
या कारवाईमध्ये पोलिस निरीक्षक अरुण देवकर (स्थानीय गुन्हे शाखा), डी.बी. जगाचे, जी.बी. बदने, पो.उपनि. नितीन चतुरे, तसेच इतर पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचा समावेश होता. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन विशेष तपास पथके पुणे येथे रवाना करण्यात आली असून लवकरच त्यांनाही अटक करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी दिली