फलटण चौफेर दि २२ जून २०२५
न्यू इंग्लिश स्कूल, सुरवडी येथे दि २१ रोजी सकाळी ७.३० वाजता आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गातील १७६ विद्यार्थ्यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्याध्यापक राजेंद्र घाडगे सर यांनी योगाचे महत्त्व पटवून देत आरोग्यदायी जीवनासाठी नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.या वेळी क्रीडा शिक्षक विजय साळुंखे सर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्त्व सांगत, “योग केवळ शारीरिक आरोग्यासाठी नाही तर मानसिक स्थैर्यासाठी देखील आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात विद्यालयातील शिक्षक आनंदराव घनवट व वर्धमान गायकवाड सर यांनी विद्यार्थ्यांना योगाची प्रात्यक्षिके करून दाखवली आणि सर्व विद्यार्थ्यांना योगासन करण्यास प्रोत्साहित केले.शिक्षण विभाग, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक सेल्फी माँ के नाम’ हा विशेष उपक्रम देखील राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत सुमारे २०० विद्यार्थ्यांनी आपल्या घरी वृक्षारोपण केले आणि त्या वृक्षासोबत आपल्या आईसोबत सेल्फी काढून शिक्षण विभागाच्या लिंकवर अपलोड केली.
आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ या वर्षी “एक पृथ्वी, एक आरोग्यासाठी योग” या मुख्य संकल्पनेवर आधारित साजरा करण्यात आला. हा योग दिनाचा ११ वा वर्धापन दिन असून, योगाच्या माध्यमातून पर्यावरण सुसंवाद व सर्वांगीण आरोग्य यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन विजय साळुंखे सर यांनी तर आभार प्रदर्शन महेश सोनवले सर यांनी केले. सूत्रसंचालन सौ. विद्या कदम व कु. स्मिता बलखंडे यांनी केले.विद्यार्थ्यांचा सहभाग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यालयाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे योग दिनाची ही सुरेख सांगता झाली.