फलटण चौफेर दि २१ जून २०२५
सुरवडी (ता. फलटण) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुरवडी येथे २१ जून रोजी जागतिक योग दिन अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी तसेच गावातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापक सतीश नलावडे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून दिलेल्या जागतिक योग दिनाच्या संदेशाचा त्यांनी उल्लेख केला. "योगामुळे पचनशक्ती वाढते, पोट कमी होते, जीवन तणावमुक्त होते, हार्मोन्सची वाढ होते आणि योग ही एक जीवनशैली बनते," असे त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण योग प्रशिक्षक सौ. स्वाती पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेले योग सत्र होते. त्यांनी विद्यार्थ्यांना ताडासन, वीरभद्रासन, चक्रासन, सुप्त कपोतासन, मत्स्यासन, कुक्कुटासन, त्रिकोणासन, वज्रासन, सर्वांगासन, भुजंगासन, पूर्ण भुजंगासन, धनुरासन, खलासन, पश्चिमोत्तानासन, योगनिद्रासन, गर्भासन आणि शीर्षासन ही विविध योगासने शिकवली. विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साह आणि शिस्तबद्धतेने योगाचे सादरीकरण केले.
या कार्यक्रमात देवा हेल्थ अँड वेलनेस सेंटर, सुरवडी येथून आलेले मार्गदर्शक राणी बाबर, सागर बाबर, निलेश शिंदे, भरत शिंदे, रमेश जगताप आणि शशिकला जगताप यांनी ४५ मिनिटांचे वर्कआउट सत्र घेतले. उपस्थित सर्व सहभागी यांनी या सत्रात घाम गाळत सक्रिय सहभाग नोंदवला.
मुख्याध्यापक सतीश नलावडे यांनी जागतिक स्तरावर योग दिन साजरा होण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यांनी पंतप्रधान मोदींच्या संदेशाचा संदर्भ देत सांगितले की, आज जवळपास दोन कोटी भारतीय नियमित योग साधना करतात आणि सैनिकांपासून ते नवसैनिकांपर्यंत, हिमालयातील जवानांपासून ते नौकांवर कार्यरत कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांमध्ये योगाचे महत्त्व पोहोचले आहे. जागतिक स्तरावर न्यूयॉर्क, लंडन, अमेरिका यांसारख्या देशांनी देखील या उपक्रमात सहभाग नोंदवला असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कोळेकर यांनी केले, तर सौ. लता इंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सौ. स्वाती पानसरे यांनी प्रत्येक शनिवार 'पाच योग' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी नियमित मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले.