फळटण चौफेर दि ३० जून २०२५
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या रविवारी झालेल्या मुक्कामी दोन वारकऱ्यांचा विजेचा जोरदार शॉक बसून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना २९ जून रोजी दुपारी चार वाजता फलटण तालुक्यातील बरडजवळील टोल नाक्याजवळ घडली. मृतांमध्ये मधुकर तुकाराम शेंडे (वय ५६, रा. मेडीकल चौक, नागपूर) व तुषार रामेश्वर बावनकुळे (वय २२, रा. खलासना, नागपूर) यांचा समावेश आहे.
दोघेही निस्सीम विठ्ठलभक्त होते सहकाऱ्यांसोबत मुक्कामी टेंट उभारणी करताना लोखंडी रॉड हातात घेतल्यावर तुषार याला विजेचा जबरदस्त झटका बसला. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या मधुकर शेंडे यांनाही जोरदार विजेचा धक्का बसला दोघांना तत्काळ १०८ अॅम्ब्युलन्सद्वारे नातेपुते येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेने वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे. सोहळ्याच्या ठिकाणी शोककळा पसरली असून दोघांच्याही घरात व गावात शोकसागर पसरला आहे.