फलटण चौफेर दि. ६ मे २०२५
महाराष्ट्र शासन कृषी खात्यांतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना, तालुका शाखा फलटण यांच्यावतीने आज काळ्या फिती लावून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या होऊ घातलेल्या आकृतिबंधामध्ये कृषी सहाय्यक पदोन्नतीची कुंठितावस्था दूर करण्यात यावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कृषी सहायक संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला असून पहिल्या टप्प्यात आज काळया फिती लावून कामकाज सुरु ठेवले आहे. विविध टप्प्यांत आंदोलन करण्यात येणार असून त्यामध्ये संघटनेने दि. ६ मे रोजी सर्व शासकीय व्हॉट्स ॲप ग्रुपमधून बाहेर पडणे, दि. ७ मे रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन, दि. ८ मे रोजी कृषी सहाय्यक एक दिवस सामूहिक रजेवर जातील, दि. ९ मे रोजी सर्व ऑनलाइन कामकाजावर बहिष्कार, दि.१५ मे रोजी सर्व योजनेचे काम बंद आंदोलन अशा पद्धतीने आंदोलनाचे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. त्याची सुरुवात आज काळया फिती लावून करण्यात आली.सध्या कृषी सहाय्यकांची एकूण ११ हजार ५२७ पदे अस्तित्वात असून कृषी पर्यवेक्षकांची ७०० पदे मंजूर आहेत, त्यामुळे कृषी सहाय्यकांना सेवेची २० ते २५ वर्षे झाल्यानंतरही पदोन्नती मिळत नाही. सद्यःस्थितीमध्ये कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण ६:१ याप्रमाणे आहे, ते ४:१ याप्रमाणे करण्यात येणे आवश्यक आहे. यामुळे कृषी सहाय्यकांची पदोन्नतीची कुंठितावस्था दूर होऊन त्यांना पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील. या प्रमुख मागणीसाठी व कृषी सहाय्यक यांना प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर कामकाज करीत असताना उद्भवणाऱ्या विविध अडचणींची सोडवणूक करण्यात यावी, यासाठी कृषी सहाय्यक
संघटनेने ऐन खरिपाच्या तोंडावर आक्रमक आंदोलनाची भूमिका घेतली आहे कृषी सहाय्यक संवर्गाच्या विविध अडचणी संदर्भात संघटनेने वेळोवेळी शासन दरबारी निवेदने देऊन व बैठकांमध्ये अडचणी सोडवण्याची मागणी केली आहे, आश्वासने दिली आहेत पण प्रत्यक्ष कृती नसल्याने आंदोलन सुरु करावे लागल्याचे सांगण्यात आले आहे. कृषी सहाय्यक ते कृषी पर्यवेक्षक यांचे प्रमाण ४:१ याप्रमाणे करण्यात यावे, कृषी सहाय्यक संवर्गाचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करण्यात यावे, कृषी सेवक कालावधी रद्द करुन कृषी सहाय्यकांना नियमित कृषी सहाय्यक पदाचे आदेश देण्यात यावेत, कृषी विभागामध्ये वाढत्या ऑनलाइन कामाचा व्याप लक्षात घेता कृषी सहाय्यकांना लॅपटॉप उपलब्ध करुन देण्यात यावेत, कृषी सहाय्यकांना कायम स्वरुपी मदतनीस देण्यात यावा, 'पोकरा' सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये कृषी सहाय्यक यांना मदतनीस म्हणून समूह सहाय्यक देण्यात यावेत, कृषी निविष्ठा वाटपामध्ये सुसूत्रता आणावी, अशा विविध मागण्या व अडचणींसाठी कृषी सहाय्यक संघटनेने आंदोलन सुरु केले असून शासन स्तरावर दखल घेतली गेली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत आंदोलनाचे पुढील टप्पे जाहीर करण्यात आले आहेत. दि. ९ एप्रिल २०२५ रोजी पुणे येथील कृषी विभागाच्या कार्यशाळेमध्ये कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी, कृषी सहाय्यकांना लॅपटॉप देणार, कृषी सहाय्यक संवर्गाचे पदनाम बदल करणार असल्याचे सांगितले होते, परंतू प्रत्यक्षात या घोषणा अद्याप पूर्णत्वास आलेल्या नाहीत. क्षेत्रीय पातळीवर काम करताना कृषी सहाय्यकांना विविध अडचणीना तोंड देत काम करावे लागत आहे. कृषी सहाय्यकांवरील अन्यायाविरोधात वरिष्ठ स्तरावरुन कुठलीही दखल घेतली जात नसल्याचे कृषी सहाय्यक संघटनेचे म्हणणे असल्याने नाइलाजाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत असल्याचे संघटना पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले