फलटण चौफेर दि २१ मार्च २०२५
फलटण तालुक्यातील आदर्की खुर्द, गावच्या हद्दीत प्रेम संबंधांची बदनामी केल्याच्या संशयातून दोघांनी एकावर आधी चार चाकी गाडीने धडक देऊन व नंतर कोयत्याने वार करत खून केल्याची घटना घडली आहे. रत्नशिव संभाजी निंबाळकर (रा. आदर्की खुर्द) असे खून झालेल्या व्यक्तिचे नाव आहे. दि. १२ रोजी ही घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांवर लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.दत्तात्रेय उर्फ काका व्यंकट निंबाळकर, विनोद महादेव राक्षे (दोघेही रा. आदर्की खुर्द) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील विनोद राक्षे याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कमलेश संभाजी निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रत्नशिव निबाळकर यांनी प्रेमसंबधात बदनामी केल्याच्या संशयातून बुधवार, दि. १२ मार्च रोजी सकाळी १०.१५ च्या सुमारास आदर्की खुर्द ता. फलटण गावच्या हद्दीत आदर्की बुद्रुक ते आदर्की खुर्द जाणाऱ्या रोडवर निंबाळकर यांच्या दुचाकीला संशयितांच्या कारने धडक दिली.यामध्ये निंबाळकर हे खाली पडले. यानंतर संशयितांनी निंबाळकर यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये निंबाळकर हे जखमी झाले. या घटनेनंतर दोघेही पसार झाले. यानंतर काही दिवसात विनोद राक्षे याला पोलीसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता दि.२५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.