फलटण चौफेर दि १० श्रीमंत राजे तुम्ही अजून राष्ट्रवादीत आहात. तुम्ही उघड उघड दिपक चव्हाण यांच्या प्रचाराला जावा मग मी पण बघतो तुमची आमदारकी कशी राहते ते. यामध्ये मी प्रतिज्ञापत्रच करणार आहे पक्षशिस्त मोडण्यावरून. तुम्ही तिकडे गेलाय ना मग आमदारकीला लाथ मारा. तुमच्यात खरंच धमक असेल तर आमदारकीला लाथ मारून जा, असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. रामराजे यांना दिले. तालुक्यातील संस्था दुसऱ्याला चालवायला दिल्या हे त्यांचे कर्तृत्व, असा टोलाही त्यांनी लगावला.साखरवाडी, ता. फलटण येथे फलटण-कोरेगाव विधानसभेचे महायुतीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी खा. नितीनकाका पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, उमेदवार सचिन पाटील, प्रल्हादराव साळुंखे पाटील, बाळासाहेब सोळसकर, शिवरुपराजे खर्डेकर, अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर, माणिकराव सोनवलकर, डी. के. पवार, धनंजय साळुंखे पाटील,विक्रमसिंह भोसले, राम निंबाळकर, जयकुमार शिंदे, शरयू साळुंखे पाटील उपस्थित होते.
ना. अजित पवार म्हणाले, आ. रामराजे ना. निंबाळकर यांच्याकडे तालुक्याची सूत्रे दिली. त्यांनी अपक्ष म्हणून सुरूवात केली. त्यानंतर ते राष्ट्रवादीत आले. शिवाजीरावदेशमुखांचा वाईटपणा घेवून रामराजेंना विधान परिषदेचे सभापती केले. पण त्यांनी आता वेगळी चूल मांडली आहे. श्रीमंत राजे दरवाजे लावून बैठका घेतात हे आपल्याला शोभत नाही.रणजित व रामराजेंचे का जुळले नाही हे माहित नाही. त्यांची नेहमी एकमेकांशी चुरस असायची. बारामतीत काकडे व पवार यांची तीन पिढ्यांची चुरस होती. मात्र, त्यांच्याच घरातील एक मुलगा आता सोमेश्वरला संचालक आहे. यांच्या कारखान्याला नाव श्रीरामाचे अन् दिलाय चालवायला. २५ वर्षे, अख्खी पिढी कारखाना चालवला तरी तुमचा दर कमी. तुमच्यात धमक व ताकत नाही का? तुम्हाला कारखाना का चालवता येत नाही. मोक्याच्या जमीनी का विकल्या? सुभाषरावांच्या ताब्यातून घेतलेल्या दूध संघाचे वाटोळे केले, संघाची जागा विकली.श्रीमंत लोक जागा विकायला फार चांगले आहेत. खर्डेकरांच्या ताब्यातून मार्केट कमिटी ताब्यात घेतली. दुसऱ्याला स्पर्धक होवू द्यायचा नाही. ही त्यांची वृत्ती आहे, असेही अजित पवार म्हणाले.माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर म्हणाले, कारखान्याची जमिन लिलावात विकून त्यांनी स्वार्थ साधला आहे. तालुक्यात सर्वात जास्त गुंडगिरी रामराजेंची आहे. अजितदादांनी रामराजेंना जेवढं दिलं त्याच्या ५० टक्के आम्हाला दिलं तरी तालुक्याचा कायापालट आम्ही करून दाखवू. अजितदादांशी ज्यांनी गद्दारी केली त्यांना हा तालुका गाडून टाकेल.