फलटण चौफेर दि २९ नोव्हेंबर २०२४
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, फलटण येथे ब्रह्मविद्या प्रकाश योग शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या शिबिराचे आयोजन महाविद्यालयाच्या आरोग्यविषयक जागरुकतेच्या उपक्रमांतर्गत करण्यात आले होते. शिबिरात ब्रह्मविद्या साधक संघाच्या माध्यमातून माननीय श्री. भणगे यांनी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरात ‘प्रकाश योग’ या अनोख्या साधनेद्वारे आरोग्य आणि यशाची गुरुकिल्ली कशी प्राप्त करता येईल, यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. ब्रह्मविद्येचे अध्यात्मिक श्वसन प्रकार, ध्यानधारणा, श्वसनाचे आरोग्याशी असलेले संबंध, तसेच विचार शक्ती कशी विकसित करावी यावर भर देण्यात आला. जीवन अधिक सुदृढ, बलशाली व यशस्वी करण्यासाठी ब्रह्मविद्येचा वापर कसा करता येईल, याची प्रात्यक्षिकांसह सखोल माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे सर होते. त्यांनी ब्रह्मविद्येच्या महत्त्वावर भाष्य करताना सांगितले की, “प्रकाश योग हे केवळ साधन नाही, तर व्यक्तिमत्व विकासासाठी एक महत्त्वाचा आधार आहे.” यावेळी ब्रह्मविद्या साधक संघाचे गुरु श्री. भणगे यांनी ‘श्वसन व विचार’ हे जीवनाचे महत्त्वाचे घटक असल्याचे नमूद केले आणि यामुळे शरीर-मन तंदुरुस्त राहते, असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून निवृत्त प्रा. अनंत डोईफोडे उपस्थित होते. त्यांनी शिबिराचे कौतुक करत ब्रह्मविद्येच्या सखोलतेबद्दल आपले अनुभव व्यक्त केले. या शिबिरामुळे महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना त्यांच्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक आरोग्याची कशी काळजी घ्यावी याची प्रेरणा मिळाली. शिबिराच्या शेवटी सर्व सहभागींसाठी प्रश्नोत्तराचा विशेष सत्र आयोजित करण्यात आले, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे आयोजन स्टाफ वेल्फेअर सेल मार्फत करण्यात आले आणि सर्वांनी या शिबिराला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही नियमितपणे आयोजित करण्यात येतील, असे प्राचार्यांनी नमूद केले.