विडणी (योगेश निकाळजे) -विडणीमध्ये रात्रीत दोन ठिकाणी शेळ्या चोरीची घटना घडली असून यामध्ये चोरट्यांनी सुमारे शेळ्या लंपास केल्याची घटना घडली आहे,यामुळे विडणी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवार दि. २३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री अंकुश नारायण नाळे यांच्या गोठ्यातील सर्वच्या सर्व ९ शेळ्या कंपाउड तोडून चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत,तसेच त्यांच्या शेजारील अक्षय शिवाजी शिर्के यांच्या घरा शेजारील बंद गोठयात ही चोरांनी तारेचे कंपाउंड तोडून ३ शेळ्या चोरल्या आहेत. एकाचवेळी १२ शेळ्या त्याही बंद गोठ्यातून चोरीला गेल्या मुळे विडणी मध्ये एकच खळबळ उठाली आहे. या घटनेमुळे विडणीतील शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ,नुकतेच काही महिन्यांपूर्वी बिबट्याने अनेक जनावरांवर हल्ला केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपल्या गोठयाला तारांचे कंपाउंड केले आहे. परिणामी चोरटे तारेचे कंपाऊंड तोडून शेळ्या लंपास करत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील आठवडयातही विडणी मधील पोंदकुले वस्तीमधील दत्तू पिसे यांच्या घरासमोरूनही अशाच प्रकारे बंद कंपाउंड तोडून ३ शेळ्या चोरून नेल्या आहेत. सध्या विडणीमध्ये ऐन दिवाळीच्या तोंडावर चोऱ्याचे सत्र चालू असल्याने पोलीस प्रशासन या चोऱ्यांवर अंकुश ठेवू शकणार का? गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांचे झालेले नुकसान परत मिळणार का ? आणी जे कोणी चोर असतील त्यांच्या मुसक्या आवळणार का ? हा प्रश्न समस्त विडणीकरांनी उपस्थित केला असून पोलीस प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.