फलटण चौफेर दि १५फलटण एज्युकेशन सोसायटीचे अभियांत्रिकी महाविद्यालय फलटण येथे प्रथम वर्ष डिप्लोमा व थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे शासनाचे सुविधा केंद्र सुरू झाले आहे. या सुविधा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिप्लोमा प्रवेशासाठी मोफत ऑनलाइन अर्ज करणे, डॉक्युमेंट स्कॅन करणे, अपलोड करणे व कन्फर्मेशन करणे करता येणार आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्ष डिप्लोमा व आय.टी.आय. तसेच बारावी सायन्स मॅथेमॅटिक्स विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट द्वितीय वर्ष डिप्लोमाला प्रवेश सुरू झालेले आहेत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग व सिविल इंजिनिअरिंग हे डिप्लोमा कोर्सेस फलटणच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात उपलब्ध आहेत. उच्चविद्याविभूषित प्राध्यापक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, अत्याधुनिक कार्यशाळा, नोकरी व व्यवसायाच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध असून याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. नरेंद्र नार्वे यांनी केले.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तंत्रशिक्षण संचालनालयाने (डीटीई) इंजिनीअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू असून, प्रथम वर्ष डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला बुधवार २९ मे २०२४ पासून सुरुवात झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २५ जून आहे तसेच थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया 12 जुन रोजी सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 3 जुलै 2024 पर्यंत असून या मुदतीत विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत अशी माहिती ‘डीटीई’कडून देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर, आवश्यक कागदपत्रे आणि दाखले अपलोड करावे लागतील. त्यानंतर ई-स्क्रूटिनी पद्धत निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुविधा केंद्रांच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करण्यात येईल. कागदपत्रांच्या पडताळणीत काही अडचण उद्वभवल्यास, त्याची माहिती विद्यार्थ्याला प्रणालीतून देण्यात येईल. त्यानंतर विद्यार्थ्याने ‘लॉग इन’ करून त्रुटीची पूर्तता करून, पुन्हा अर्ज ‘सबमिट’ करायचा आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष पडताळणी निवडलेल्या विद्यार्थ्यांनी सुविधा केंद्रांवर दिलेल्या वेळेत उपस्थित राहून, अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, पडताळणी करणे अशा बाबी करायच्या आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
फलटण परिसरातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाची मान्यता असणाऱ्या या सुविधा केंद्राचा लाभ घेऊन डिप्लोमा कोर्सेस ला प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी व फलटणमध्येच उपलब्ध असणाऱ्या या गुणवत्ता पुर्ण तंत्रशिक्षणासाठी प्रवेशित व्हावे असे आवाहन फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
.jpg)
