फलटण चौफेर दि १९ : फलटण शहरामध्ये गुन्हे प्रतिबंधासाठी शहर पोलिसांनी दोन दिवस नाकाबंदी करून नियमबाह्य पद्धतीने दुचाकी चालविणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई व वाहनांची तपासणी केली यावेळी एकूण ४० वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन फलटण शहर पोलिस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे. फलटण शहरामधील बारामती पूल येथे व सातारा पूल येथे नाकाबंदी करून दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरामध्ये अनेकदा तीन किंवा त्यापेक्षा जास्त जण दुचाकीवरून प्रवास करतात.अनेक दुचाकींना नंबरप्लेट नसल्याचे अथवा ती व्यवस्थित दिसत नसल्याच्या घटना निदर्शनास आल्या आहेत. फलटण शहरातील गुन्ह्यांचा आढावा घेता अनेक गुन्ह्यांमध्ये वाहनांचा वापर झाला असल्याचे निदर्शनास आले आहे. या पद्धतीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये, विनापरवाना वाहन चालवू नये, वाहनांना नंबरप्लेट असावी व ती सुस्पष्ट दिसावी, त्याचबरोबर वाहनांच्या कागदपत्रांची खात्री करावी व वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन फलटण शहर पोलिस ठाण्याच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.