फलटण चौफेर दि २
माढा लोकसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत संजीवराजेंनाच उमेदवारी घेणार असून जर त्यांना उमेदवारी मिळाली नाही तर विद्यमान खासदारांना सुद्धा उमेदवारी मिळवून देणार नसल्याचा इशारा विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला
आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या उमेदवारीबाबत नेमकी काय भूमिका घ्यायची? यावाबत कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी कोळकी, ता. फलटण येथील अनंत मंगल कार्यालयामध्ये फलटण, कोरेगाव, माण, खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक-निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, मायणी अर्बन बँकेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, खटाव तालुका राष्ट्रबादी काँग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार मोरे, बाळासाहेब सोळसकर, मनोज पोळ, संदीप मांडवे, श्रीराम कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे उपस्थित होते. कार्यकत्यांनी संजीवराजे यांच्या उमेदवारीबद्दल अत्यंत आग्रही मागणी केली. बहुतांश कार्यकत्यांनी ठामपणे आपली मते मांडली. कोणत्याही परिस्थितीत संजीवराजे यांना उमेदवारी आणण्याचा माझा प्रयत्न आहे अन तो मी यशस्वी करणारच त्यातूनही बाबांना उमेदवारी मिळाली नाही तर 'त्यांना' ही (रणजितसिंह नाईक-निंबाळकर) उमेदवारी मिळू देणार नाही. आ. रामराजे पुढे म्हणाले, इथं आलेला माणूस स्वतःहन आलेला आहे. इथे कोणालाही जबरदस्तीनेएस. टीने आणलेलं नाही. ७६व्या वर्षी मी अपक्ष म्हणून उभा राहतो, तुम्ही पण राहा बघूया काय होतंय. मलटणच्या बाहेर तुम्हाला काय माहीत होते? तुम्ही आता दिल्ली बघायला गेला. आम्ही केलेल्या कामांवर दोन नागोबा रेघोट्या मारत बसलेत. संजूबाबांना उमेदवारी मिळवण्यासाठी मी पराकोटीचा प्रयत्न करणार आहे. जर बाबांना उमेदवारी मिळाली नाही तर त्यांनाही उमेदवारी मिळू देणार नाही. त्याने कुठेही जाऊ देत. उमेदवारी मिळू देणार नाही म्हणजे नाही, असा इरादाही आ. रामराजे यांनी यावेळी बोलून दाखवला. मी गत तीस वर्षात पाणी प्रश्नासाठीच काम केलं होतं. धोम आणि कोयना धरण सोडलं तर जिल्ह्यातील सर्व धरणं उभी करण्याचा मी प्रयत्न केला. कर्जरोखे काढून कृष्णा खोरे मंडळाच्या माध्यमातून धरणं उभी करण्याचं धोरण घेतलं, त्याची प्रशासकीय मान्यताही घेतली. पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावला. डोंगर दऱ्याखोप्यात हिंडलो. त्यामुळे धरणं झाली. धरण झालं नसतं तर कालचं काळजच भूमिपूजन झालं असतं का?असा सवालही त्यांनी केला. उरमोडी, तारळी धरणांचं खरं श्रेय प्रकल्पग्रस्त तसेच अभयसिंहराजे भोसले, पाटणकर यांचे आहे. रामराजेंचे वय वाढलं म्हणून त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय असं खासदार म्हणतात यावर टीका करताना रामराजे यांनी, अहो तुम्ही मंदबुद्धी म्हणूनच जन्माला आल्याचे म्हटले. खासदारांना तुम्ही परत निवडून देण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमचा आगवणे होईल,असा इशाराही आ. रामराजेंनी उपस्थितांना दिला.
आ. दीपक चव्हाण म्हणाले, आ. रामराजे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याचा चौफेर विकास झाला आहे. तालुक्यात शांतता आहे. विकासाची घडी बसलेली आहे. ही घडी मोडण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर आपण गप्प बसता उपयोगाचे नाही. त्यासाठी आपणाला बाबांना दिल्लीला पाठवायचे आहे.
संजीवराजे प्रास्ताविकात म्हणाले, रामराजेंच्या माध्यमातून कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली. त्या माध्यमातून दुष्काळी तालुक्यातील अनेक भागांना पाणी पोहोचले, हे आपण पाहता. ज्या जिल्ह्याला सर्वाधिक दष्काळी जिल्हा म्हणून म्हंटल जायचं त्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आज महाराष्ट्रातील सर्वाधिक साखर कारखाने आहेत, ही किमया कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना झाल्यामुळे घडली. तालुक्यात शांतता प्रस्थापित झाली असताना वेगळ्या प्रवृत्ती आज आपणाला तालुक्यात अनुभवायला मिळत आहेत. हे थांबवण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यायला हवी. राष्ट्रवादी काँग्रेसचा माढा मतदारसंघ बालेकिल्ला आहे. गेल्या वेळी इकडून तिकडे, तिकडून इकडे झाल्याने अपघाताने 'ते' खासदार झाले. हा अपघात माळशिरस तालुक्याने केला तो दुरुस्त करण्याची वेळ आली आहे.
सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, बाळासाहेब सोळसकर, रमेश धायगुडे, सुभाष नरळे, मनोज पोळ, रूपाली रणवरे, विकास साळुंखे, मनोज गावडे आदिनी मनोगतातून संजीवराजे निंबाळकर यांना उमेदवारी मिळालीच पाहिजे, कशी मिळवायची ते तुमचे तुम्ही बघा, बाबांसारखे सुसंस्कृत नेतृत्व दिल्लीला गेल्याशिवाय माढा मतदारसंघाचा चौफेर विकास होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. जयकुमार इंगळे यांनी आभार मानले.