फलटण चौफेर दि १ सुरवडी, ता. फलटण गावाच्या हद्दीत राजरोसपणे अवैध दारूची विक्री केली जात आहे. अवैध विक्रीच्या ठिकाणी व रस्त्यावरील मद्यपींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या अवैध दारू विक्रेत्यांचा बंदोबस्त करून पोलिस गावातील दारू विक्री कायमची बंद करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
सुरवडी गावात औद्योगिक वसाहत आल्यामुळे गावात परप्रांतीय तसेच इतर मजुरांची संख्या वाढली आहे. याचाच फायदा घेत गावातील दोन अवैध दारू विक्रेते मागील कित्येक वर्षांपासून खुलेआम राजरोसपणे अवैध दारूची विक्री करत आहेत. यामुळे अनेकदा गावात वादविवाद होऊन भांडणाचे प्रसंगसुद्धा घडले आहेत. मागील काही दिवसात पोलिसांनी या अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई केली होती. मात्र कारवाईच्या दुसऱ्याच दिवशी हे निर्मावलेले दारू विक्रेते दारू विक्रीस सुरुवात करत आहेत. त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पोलिस व कायद्याचा वचक राहिला नसल्याचे दिसते. या मद्यपींचा त्रास नागरिकांना होत आहे. या अवैध दारू विक्रीमुळे तरूणांमध्ये व्यसनाचे प्रमाण वाढले आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत असून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.