फलटण चौफेर दि ३१ : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेने फलटण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या स्पर्धेत फलटण तालुक्यातील ७ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी एकाच वेळी अनुलेखनाचे धडे गिरवले. म.सा.प.फलटण शाखेच्या या अनोख्या उपक्रमाचे शिक्षण क्षेत्रात कौतुक होत आहे.
म.सा.प.फलटण शाखेच्यावतीने साहित्यिक उपक्रमांबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वा देण्याचा नेहमीच प्रयत्न केला जात असतो. त्याचअनुषंगाने २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने म.सा.प. फलटण शाखेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांच्या मार्गदर्शनात फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अनुलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत फलटण तालुक्यातील २२ केंद्रामधील ३०३ प्राथमिक शाळांमधून इयत्ता ३ री ते ५ वी मधील ३ हजार ९३७ मुले व ३ हजार ७४६ मुली अशा एकूण ७ हजार ६८३ विद्यार्थ्यांनी एकाच दिवशी एकाचवेळी आपापल्या शाळांमधून सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेत अनुलेखनासाठी विद्यार्थ्यांना इयत्तांनुसार ‘श्यामची आई’ या सुप्रसिद्ध मराठी पुस्तकातील परिच्छेद देण्यात आले होते. सुंदर हस्ताक्षर, अनुलेखनातील अचुकता, शुद्धलेखन, लेखनातील टापटीपपणा या बाबींचे परिक्षकांकडून अवलोकन करुन गुणांकनानुसार स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था फलटणचे ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.सतीष फरांदे, फलटण पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी अनिल संकपाळ, भागविस्तार अधिकारी चनय्या मठपती यांच्या मार्गदर्शनात म.सा.प. फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेवराव गुंजवटे, कोषाध्यक्षा सौ.अलका बेडकिहाळ, कार्यवाह अमर शेंडे, ताराचंद्र आवळे, केंद्रप्रमुख दारासिंग निकाळजे, अनिल कदम, राजकुमार रणवरे, सौ.सुनंदा बागडे, सौ.अलका माने, बन्याबा पारसे, समन्वयक सौ.दमयंती कुंभार यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, सदर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठा भाषा गौरव दिनी फलटण पंचायत समितीच्या सभागृहात होणार असल्याचे स्पर्धा संयोजक महादेवराव गुंजवटे यांनी सांगितले.