साखरवाडी(गणेश पवार)
मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊन सुमारे दीड महिना लोटला असून सातारा जिल्ह्या बरोबरच धरण क्षेत्रात मान्सून सक्रिय झाला नसल्याने खंडाळा तालुक्यातील वीर धरण अवघे 20 टक्केच भरले आहे त्यामुळे खंडाळा फलटण व माळशिरस या वीर धरणातील लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या डोळे पावसासाठी आताआभाळाकडे लागले आहेत
यंदाच्या वर्षात जून महिना कोरडा गेल्याने आता जुलैमध्ये पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
वीर धरण परिसरात आजपर्यंत तुरळक पावसाने हजेरी लावली आहे. कमी पावसाचा थेट परिणाम धरणाच्या पाणी साठ्यावर झाला आहे. वीर धरणाची एकूण क्षमता ९.८ टीएमसी इतकी आहे. या धरणात निरा-देवघर व भाटघर धरणाचे पाणी येते. त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये पाऊस जरी कमी झाला, तरी दोन्ही धरणातील पाण्यामुळे वीर धरणाचा पाणीसाठा लगेच वाढतो. मात्र यंदा जुलै महिना उजाडला, तरीदेखील नीरा देवघर व भाटघर धरण परिसरातच पावसाचा पत्ता नसल्यामुळे पर्यायाने तिन्ही धरण कोरडे ठाक पडले आहेत. तसेच ३४ टक्के पेक्षा जास्त पाणी साठा झाल्याशिवाय शेतीला पाणी दिले जात नाही. सध्या धरणात २० टक्के इतकाच पाणीसाठा आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकत आहे.
दरवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धरण पूर्ण क्षमतेने भरते. मात्र यावर्षीची परिस्थिती वेगळी आहे. मागील आठवड्यात फक्त १० टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांसाठी गंभीर प्रश्न उभे राहण्याची भीती आहे