साखरवाडी(गणेश पवार)
महाराष्ट्राचे प्रश्न सोडवण्यासाठी व देशपातळीवर काम करताना जो निधी आणायचा आहे , तो आणण्यासाठी रामराजेंना आता दिल्लीला जावेच लागेल त्यामुळे आता माढा लोकसभेतून खासदारकी लढवण्याची तयारी त्यांनी करावी प्रदेशाध्यक्ष जयंतरावांनी रामराजेंना दिल्लीला पाठवण्याची जी सूचना मांडली आहे त्याला माझे पूर्ण अनुमोदन असून माझ्या व जयंतरावांच्या मागणीकडे आदरणीय पवार साहेब दुर्लक्ष करतील असे वाटत नसल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते ना अजित पवार यांनी फलटण येथे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती व फलटण संस्थानचे अधिपती आ . रामराजे नाईक निबाळकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी केले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , विधान परिषदेचे माजी सभापती आ . रामराजे नाईक निंबाळकर , आ . शशिकांत शिंदे , आ . बाळासाहेब पाटील , आ . मकरंद पाटील , आ . सुनील भुसारा , माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर , माजी आमदार प्रभाकर घार्गे , जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीनकाका पाटील , उपाध्यक्ष अनिल देसाई , प्रभाकर देशमुख , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने , डी . के . पवार , बाळासाहेब सोळसकर , जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर , रघुनाथराजे नाईक निंबाळकर , सुभाषराव शिंदे , बंटीराजे खर्डेकर शिवरुपराजे खर्डेकर , सत्यजीतसिंह पाटणकर , अनिकेतराजे नाईक निंबाळकर , विश्वजीतराजे नाईक निंबाळकर , राष्ट्रवादी औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष बंडू ढमाळ उपस्थित होते
अजित पवार म्हणाले, रामराजेंना दिल्लीला पाठवण्यासाठी आपणा सर्वांना प्रयत्न करावे लागतील . जयंतरावांच्या सूचनेला मी अनुमोदन देतो . रामराजेंना आता दिल्लीला जावेच लागेल सातारा जिल्ह्याचे नेतृत्व करताना रामराजेंनी हा जिल्हा राष्ट्रवादीमय केला . हेच काम पुढे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरु ठेवायचे आहे . धोम बलकवडी , निरा देवधर धरणाच्या बाबतीत रामराजेंचे मोठे योगदान आहे . कृष्णा खोऱ्यातील पाणी बोगद्याद्वारे भिमा खोऱ्यात आणण्याचे काम झाले नेतृत्वामध्ये धमक आणि ताकद असेल तर काय घडू शकते हे आपण पाहिले आहे . आताचे राज्यकर्ते या गोष्टीकडे लक्ष द्यायला तयार नाहीत अजित पवार म्हणाले , 1991 ला मला बारामतीकरांनी खासदार केलं आणि फलटणकरांनी रामराजेंना नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली . तसं बघितलं तर या घराण्याचे समाजकारण , राजकारणात मोठे योगदान आहे . महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासाकरता मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी साथ दिली . त्याची इतिहासामध्ये नोंद आहे . रामराजे आमदार झाले आणि फलटण तालुक्याच्या विकासाला चालना मिळाली 1995मध्ये रामराजेंबरोबर राज्यात अनेक अपक्ष आमदार निवडून आले . या सर्वांचे नेतृत्व रामराजे यांनी केले त्यांनी त्यावेळी '50 खोके एकदम ओके ' असे न म्हणता कृष्णा खोरे अस्तित्वात आणले . पाण्याचा प्रश्न सोडवायचा या अटीवरच त्यांनी सरकारला पाठिंबा दिला होता .
आ . जयंत पाटील म्हणाले , आजपर्यंतच्या इतिहासात दुष्काळी अडचणीवर मात करणारे नेतृत्व म्हणून रामराजेंकडे पाहिले जाते त्याचा मी साक्षीदार आहे कृष्णा खोरे महामंडळ काढल्याशिवाय दुष्काळ हटणार नाही ही खूणगाठ त्यावेळी रामराजेंनी बांधली होती त्यामुळे दुष्काळी भागाचा खरा भगिरथ रामराजे आहेत . फलटण , खंडाळा , खटाव , माण या तालुक्यांसाठी रामराजेंनी केलेले काम जलसंपदा विभागाच्या इतिहासामध्ये लिहले पाहिजे , सोळशी धरणाची कल्पनादेखील रामराजेंची आहे . एक सक्षम नेता रामराजेंच्या रुपाने सर्वांना मिळाला आहे . राजघराण्यातील असूनही त्यांनी राजेशाही कधी दाखवली नाही . रामराजेंच्या रुपाने फलटण व सातारा जिल्ह्याला एक वेगळं नेतृत्व मिळाले आहे . रामराजेंनी आपलं नेतृत्व दिल्लीत जावून करावे . महाराष्ट्र सरकारकडून जेवढं यायचं तेवढं रामराजेंनी आणले आहे . आता केंद्र सरकारकडून जे शिल्लक राहिले आहे ते आणण्यासाठी रामराजेना आता आपणाला दिल्लीला पाठवायचे आहे . त्यांच्या मनात असो अगर नसो , पण आता त्यांना दिल्लीला जावेच लागेल . एका चांगल्या नेतृत्वाला देशपातळीवर काम करण्याची संधी देखील शरद पवारसाहेब , अजितदादा आणि या भागातील सर्वजण नक्कीच देतील , असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला .
आ . रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले , पाण्यासाठी व दुष्काळी जनतेच्या विकासासाठी कायम आग्रही राहिलो . पाण्यासाठी एक दृष्टीकोन ठेवून काम केले . युतीच्या काळात 1 किंवा दोन आमदार असले तरी मंत्रिपदे मिळत होती . मात्र , पाणी अडवणे व धरण बांधणे किती गरजेचे आहे माझ्यासह 22 आमदारांना त्यावेळी समजले होते ते आमदार सुद्धा दुष्काळी भागातील असल्याने आम्ही एकत्र आलो . मंत्रिपद न मागता कृष्णा खोरे महामंडळ मागितले . त्यावेळी नेमकी गरज काय आहे हे ओळखून आम्ही काम केले . राज्यात इतके पक्ष आहेत मात्र राष्ट्रवादीसारखा पक्ष कुठेही नाही कोणत्याही क्षणी मंत्रिपद व खाते समजून घेणारे आमदार हे फक्त आपल्याच पक्षात आहेत . राज्याला एक चांगला मुख्यमंत्री आपणच देवू शकतो . बाकीच्यांच काही माहित नाही . पक्षात मुख्यमंत्रीपद कोणालाही द्या , आम्ही आहोतच फक्त आमचं खात आम्हाला सांभाळू द्या , असे म्हणणारे आमदार आपल्याकडे आहेत , असेही रामराजे म्हणाले , आ . रामराजे पुढे म्हणाले , खा शरद पवार कृषी मंत्री असताना तत्कालीन केंद्रीय जलसंपदा मंत्र्यांशी बैठक केल्यानेच निधी मिळाला त्यामुळेच सातारा जिल्हयातील धरणे झाली . कृष्णा खोऱ्याच्या पाण्यावर लवाद बसला असता तर सातारा जिल्हयाचे पाणी गेले असते . हे पाणी जावू नये यासाठी प्रयत्न केले . त्याला शरद पवार , अजितदादा व जयंत पाटील यांनी मोठी मदत केली त्यामुळेच साताऱ्याचे पाणी गेले तर नाहीच पण 81 टीएमसी पाणी अधिकचे मिळाले . सर्वांनी साथ दिल्यानेच हे घडू शकले , असे म्हणाले . आ . रामराजे पुढे म्हणाले मालोजीरावांनी सत्तास्थाने ताब्यात नसताना 1991मध्ये मला , संजीवराजे व रघुनाथराजेंना एकत्र आणले त्यावेळी एकत्र आलो नसतो तर फलटणचे राजकारण वेगळे दिसले असते . अजितदादांनी बारामतीकरांना विकासाचा विश्वास दिला आहे . आपल्यालाही तो निर्माण करायचा आहे . त्यासाठी नको त्या लोकांना मदत करू नका . यावेळी आ . मकरंद पाटील , आ . शशिकांत शिंदे , आ . बाळासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले . प्रास्तविक आ . दिपकराव चव्हाण यांनी केले . सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले . सुभाष शिंदे यांनी आभार मानले.