तरडगाव (नवनाथ गोवेकर)घर म्हणजे उत्सवाचे भांडार आहे. जगाच्या दुनियेमध्ये भेटलेली दुःख मिटविण्याचे साधन म्हणजे तुमचे माझे घर आहे. दुःखी झालो, खचलो, व्यथित झालो तर थकलेल्या व जखमी झालेल्या व्यथांच्यावर मलम लावणारं तुमचं माझं घर आहे. दुःखाच्या पलीकडचं हे घर आहे. घरातूनच पुढच्या पिढी साठी चांगलं तयार करायचं असतं. आम्ही आमच्या लेकरांसाठी जग तयार केलं का? घाव सोसणारी पिढी तयार केली पाहिजे. आभासी जग आणि वास्तव जग याच्या तील अंतर समजायला तयार नाही. दौलत जमा केली, ती पुढच्या पिढीला दिली जाते. हीच दौलत समजली जात आहे. संतती हीच खरी संपत्ती आहे. सत्ता, संपत्ती, सन्मान हे तर क्षणभंगुर आहे असे मनोगत माजी सनदी अधिकारी, सुप्रसिद्ध व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केले.
तरडगाव ता. फलटण येथील वेणूताई चव्हाण हायस्कूलच्या प्रांगणात माजी विद्यार्थी संघटना, माऊली विचार मंच व समस्थ ग्रामस्थ तरडगाव आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, श्रीराम एज्यूकेशन सोसायटी या संस्थेचे सचिव सचिन सुर्यवंशी - बेडके, माजी सभापती वसंतराव गायकवाड, कमिन्स कंपनीचे अधिकारी प्रवीण गायकवाड, माऊली विचार मंचचे अध्यक्ष प्रा रवींद्र गायकवाड, सरपंच, उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी देशमुख म्हणाले, माणसाला उभ करून हे जग नीतिमान केलं अशांना सन्मान देणे हे आपल्या लेकरांना शिकविता आले पाहिजे. नकारात्मक गोष्टींचा धिक्कार व योग्य गोष्टींचा स्वीकार करणारी शीलवान व चारित्र्यवान अशी नवी पिढी आम्हाला घडवायची आहे. दुसऱ्याच जीवन समृध्द करताना आपण आतून प्रगत होवून जगणं ही सगळ्यात जगण्याची उत्कट अशी प्रेरणा आहे. ही ज्याला सापडली त्याच जीवन उदात्त आहे. आयुष्यातील निर्णय घडला तर जीवन स्वर्ग आहे आणि निर्णय बिघडला तर नरक आहे. त्यासाठी बाप पिढीने जागरूक राहणे गरजेचे आहे. कार्यक्रमासाठी तरडगाव परिसरातील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, युवक उपस्थित होते.