फलटण चौफेर दि १९ ऑगस्ट २०२५
फलटण शहरात भटकी कुत्री व बेवारस जनावरे यांचा मोठ्या प्रमाणात वावर होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः लहान मुलांना व वाहन चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून, शहरातील विविध चौकात दहा-पंधरा कुत्र्यांचे टोळके दिसून येतात, तर रहदारीच्या चौकात बेवारस जनावरांचे कळप बसलेले असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढला आहे. इतकेच नव्हे तर काही प्रकरणात ही जनावरे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांवर हल्ला करू लागली असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
"एखाद्या नागरिकाचा जीव गेला तरच नगरपालिकेचे प्रशासन जागे होणार काय?" असा थेट सवाल माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केला आहे. याबाबत त्यांनी नगरपालिकेने तातडीने कारवाई करून आठ दिवसांच्या आत ठोस बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.दरम्यान, "जर प्रशासनाने दुर्लक्ष केले तर भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्र पक्ष महायुतीमार्फत नगरपरिषदेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल," असा इशाराही श्री. जाधव यांनी दिला आहे.