फलटण चौफेर दि १९ ऑगस्ट २०२५ : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर पोलिसांकडून करण्यात आलेल्या ऑनलाइन सर्वेक्षणात नागरिकांनी पारंपरिक वाद्यांनाच प्रचंड पाठिंबा दिला आहे. तब्बल ८८९ नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला असून बहुसंख्य नागरिकांनी डीजे संस्कृतीला विरोध दर्शवला आहे.या सर्वेक्षणात ८१.६ टक्के नागरिकांनी गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर व्हावा, असे स्पष्ट मत नोंदवले. तर केवळ १३.५ टक्के नागरिकांनी डीजे स्पीकर वापरावा, असा अभिप्राय दिला. डीजे वापराबाबत विचारले असता तब्बल ७४.१ टक्के नागरिकांनी डीजेला विरोध दर्शवला, तर २०.१ टक्के नागरिकांनी डीजेला समर्थन दिले आणि उर्वरितांनी तटस्थ भूमिका घेतली.
सर्वेक्षणात १६ ते २५ वयोगटातील ११.६ टक्के, २६ ते ४५ वयोगटातील ६३.४ टक्के आणि ४६ वर्षांवरील २५ टक्के नागरिकांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, ७८.७ टक्के नागरिकांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी डीजे अजिबात आवश्यक नाही, असे स्पष्टपणे सांगितले.
आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी देखील या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यात ५५.९ टक्के नागरिकांनी गुन्हे दाखल करून डीजे जप्त करण्याची मागणी केली. तर १९.५ टक्के नागरिकांनी फक्त डीजे जप्त करण्याचे मत नोंदवले, तर १३.९ टक्के नागरिकांनी केवळ गुन्हे दाखल करावेत, असे सुचवले.
फलटण पोलिसांनी केलेल्या या सर्वेक्षणातून नागरिकांचा कल स्पष्टपणे पारंपरिक वाद्यांच्या बाजूने असून डीजे संस्कृतीला विरोध असल्याचे अधोरेखित झाले आहे.