फलटण चौफेर, दि. २० ऑगस्ट २०२५
फलटण तहसील कार्यालयात आज दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत एकूण २१ मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील दिव्यांगांना ५% आरक्षणानुसार गाळा वाटप, उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांगांसाठी विशेष सेवा उपलब्ध करून देणे, अन्नधान्य सुरक्षा योजनेत दिव्यांगांना प्राधान्याने रेशन लाभ देणे, पोलीस पाटील दाखल्यासाठी शुल्क सवलत, तसेच घरकुल व जागेसाठी प्रलंबित ३१ प्रस्तावांचा मुद्दा मांडण्यात आला. यापैकी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे ७, तहसीलदार फलटण यांच्याकडे १९ तर ५ प्रस्तावांवर निकाल लागलेला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
या मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा निघावा यासाठी मी लोकप्रतिनिधी म्हणून कटिबद्ध असून, दिव्यांग बांधवांना अधिकाऱ्यांनी सौजन्याने वागणूक द्यावी, अशा सूचना आमदार पाटील यांनी यावेळी दिल्या. तसेच सर्व प्रलंबित मागण्यांचा लवकरात लवकर निकाल लावण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. "दिव्यांग बांधवांना कोणतीही अडचण आली तर मला थेट संपर्क करावा, मी त्यांचा भाऊ म्हणून कायम पाठीशी उभा असेल," असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, नायब तहसीलदार गुंजवटे, गटविकास अधिकारी सतीश कुंभार, नगरपालिका मुख्याधिकारी निखिल मोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. धुमाळ, प्रहार संघटनेचे सागर गावडे तसेच मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते.