फलटण चौफेर दि २५ जुलै २०२५
बंदी घातलेल्या नायलॉन मांज्याचा साठा विक्रीसाठी ठेवलेल्या युवकावर फलटण शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई करत एकूण 800 रुपयांचा मांजा जप्त केला आहे. ही कारवाई दि. 24 जुलै 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जब्रेश्वर मंदिर, कसबा पेठ येथील राहत्या घरात करण्यात आली.
या प्रकरणी उध्दव सुनिल जगताप (वय 23, रा. जब्रेश्वर मंदिर, कसबा पेठ, फलटण) या युवकाच्या ताब्यातून राखाडी आणि गुलाबी रंगाच्या आसारीत एकूण 600 रुपये किंमतीचे 2 रोल नायलॉन मांजा आणि गुलाबी आसारीत 200 रुपये किंमतीचे 2 रोल डिंकाचे कोटींग केलेला मांजा मिळून आला.फिर्यादी महिला पोलीस नाईक हेमा सचिन पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 259/2025 भा.न्या.सं. कलम 223, 125 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोहवा पूनम वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.