फलटण चौफेर दि १८ जुलै २०२५
ग्रिनफिल्ड अॅग्रीकेम इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपनीची तब्बल ४८ लाख ९० हजार ७९७ रुपयांची फसवणूक करणाऱ्या संदीप रामप्रसाद खरात (वय ४०, रा. प्रतिभा हाऊस, चंदुआण्णा नगर, निमखेढी, जळगाव) या संशयित आरोपीला लोणंद पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरोधात भादंवि कलम ४०६, ४२०, ४६४, ४६५, ४६७ प्रमाणे गुन्हा दाखल असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे.
दि. १५ जुलै २०२२ ते ९ ऑगस्ट २०२२ या कालावधीत तरडगाव (ता. फलटण) येथील ग्रिनफिल्ड अॅग्रीकेम इंडस्ट्रीज प्रा. लि. या कंपनीमध्ये प्रादेशिक विक्री व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेला संदीप खरात याने कंपनीचा विश्वास संपादन करून, बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘प्रतिभा अॅग्रो’ या नावाने कंपनीकडून ५१ लाख ७ हजार ७९७ रुपयांचा माल घेतला. त्यापैकी केवळ २ लाख १७ हजार रुपयांचीच रक्कम कंपनीकडे जमा करून, उर्वरित रक्कम एक महिन्यात देण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्या रक्कमेचा आजतागायत कोणताही तपशील न दिल्यामुळे कंपनीची फसवणूक झाली.
या प्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात दिनांक ११ जुलै २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. आरोपी जळगाव व छत्रपती संभाजीनगर येथे ये-जा करत असल्याची माहिती गोपनिय बातमीदारामार्फत मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.पोहवा प्रविण मोरे व पोकों. शेखर शिंगाडे यांचे पथक जळगाव व छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले. आरोपीच्या हालचालींची माहिती वेळोवेळी तपास पथकास देण्यात आली. अखेर छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याला फलटण न्यायालयात हजर केले असता दिनांक २१ जुलै २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.सदर कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय अधिकारी राहुल धस व लोणंद पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पो.उ.नि. ज्योती चव्हाण, देवेंद्र पाडवी, पोहवा प्रविण मोरे, धनाजी भिसे, पोना. बापुराव मदने, पोकों. शेखर शिंगाडे, सुनिल नामदास, अमोल जाधव, अंकुश कोळेकर व विठ्ठल काळे यांनी सहभाग घेतला.
या यशस्वी कारवाईबद्दल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सर्व पथकाचे कौतुक करण्यात आले आहे.