फलटण चौफेर दि. २९ जून २०२५
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरवडी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही ७२ तास चालणाऱ्या अन्नछत्राचे आयोजन करण्यात आले होते मागील २१ वर्षांपासून सुरु असलेली ही सेवा वारकऱ्यांसाठी एक मोठा आधार ठरली आहे. यंदा सुमारे २० ते २५ हजार वारकऱ्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
या अन्नछत्राचे आयोजन सुरवडी गावचे जावई शिवाजीराव दडस यांच्या पुढाकारातून करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांसह मुंबई येथील मित्र परिवाराने या सेवेसाठी विशेष श्रमदान केले. अन्नछत्रामध्ये स्वच्छता, सातत्य, आणि वारकऱ्यांच्या गरजांची काळजी घेत अन्नवितरण करण्यात आले. या ठिकाणी महिला, वृद्ध, पुरुष आणि लहान मुले यांना प्रेमपूर्वक भोजन दिले जात होते.अन्नछत्राच्या व्यवस्थेतील शिस्त, सातत्य व सेवाभाव पाहून अनेक वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. घरगुती चव असलेल्या भोजनाचा आस्वाद घेत वारकरी तृप्त होऊन पुढच्या प्रवासासाठी सज्ज झाले.
या सेवेमुळे वारकरी भाविकांचे श्रमपरिहार तर झालेच, पण 'सेवेची परंपरा हीच खरी संतसेवा' याची प्रचिती देणारा एक जिवंत अनुभव प्रत्येकाने अनुभवला. अन्नछत्राचे व्यवस्थापन, स्वयंपाक, स्वच्छता आणि स्वयंसेवकांचे योगदान या सर्व बाबींनी हे आयोजन यशस्वीपणे पार पाडण्यात आले.