फलटण चौफेर दि ७ मे २०२५: अंगणवाडी ते इयत्ता ४थी, ५वी पर्यंत प्राथमिक शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्याचे काम शिक्षक करीत असतात. प्रत्येक विद्यार्थ्याने उज्ज्वल यश संपादन करावे ही शिक्षकांची तळमळ असते.परंतु विद्यार्थ्यांसाठी पुढे शैक्षणिक, व्यावसायिक क्षेत्र आव्हानात्मक ठरत असून मुलांच्या भवितव्यासाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष द्यायला हवे असे प्रतिपादन विडणी गावचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी केले.जि. प. प्रा. शाळा विद्यानगर, विडणी येथे इयत्ता ५ च्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभामध्ये ते विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन अभंग मुख्याध्यापक राजाराम तांबे , उपशिक्षक प्रा. रवींद्र परमाळे यांची प्रमुख उपस्थिती होती .
सरपंच अभंग पुढे म्हणाले, येथील विद्यानगर शाळेमध्ये शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात मोठ्या पदांवर सध्या कार्यरत आहेत. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी यश मिळवले आहे हे सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे सध्या शिष्यवृत्ती, नवोदय व इतर परीक्षांमध्ये स्पर्धा आहे. तरीही या शाळेतील विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये उत्तीर्ण होत असून गुणवत्ता यादीत स्थान मिळवित आहेत. या ठिकाणी त्यांना शिकविणारे , मार्गदर्शन करणारे शिक्षक प्रा. परमाळे सर यांनी विद्यार्थ्यांच्या यशासाठी अतोनात कष्ट घेतले आहेत . येथे चांगली गुणवत्ता आहे . येथील सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या यशाचा जो पाया रचला त्या पायावरच सुंदर इमारत उभी करण्याचे काम भविष्यात विद्यार्थ्यांनी करावे तसेच पालकांचेही आपल्या मुलांवर लक्ष हवे. तरच त्यांच्या उज्ज्वल यशाबरोबरच सर्वांगीण विकास होण्यासाठी मदत होईल .भविष्यात गोर-गरीब विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.मुख्याध्यापक तांबे सर म्हणाले , या शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक स्पर्धांमध्ये जे यश संपादन केले आहे त्यासाठी या शाळेतील शिक्षक प्रा .परमाळे सर यांनी खूप कष्ट घेतले आहेत. विद्यार्थ्यांच्या यशासाठी त्यांनी जादा तास घेत विद्यार्थ्यांना शिकवित मार्गदर्शन केले. त्यांच्यासारखे शिक्षक या विद्यानगर शाळेस लाभले ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.यावेळी परमाळे सर म्हणाले, शाळेतील विद्यार्थ्यांना मी नेहमीच सर्वोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न केला असून पुढे पालकांनी त्यांच्या ध्येय निश्चितीसाठी कोणतेही दडपण न आणता त्यांना प्रोत्साहित करावे. आपल्या मुलांना व्यसन, मोबाईल पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा . असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांचे फेटा व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी निरोपांच्या मनोगतांमध्ये शाळेतील आठवणी व मार्गदर्शक श्री. परमाळे सर व इतर शिक्षकांप्रती असलेला आदर व कृतज्ञता आपल्या भावनेतून व्यक्त करून त्यांनी आपल्या गुरुवर्यांचे आशीर्वाद घेतले. कार्यक्रमास सर्व शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते.