फलटण चौफेर, दि. २५ मे २०२५ – फलटण शहर व तालुक्यात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अवकाळी पावसामुळे मलठण येथे एक भिंत कोसळून दुचाकीचे नुकसान झाले आहे.
पावसाचा जोर इतका आहे की, अनेक ठिकाणी ओढे, नाले आणि भरून वाहू लागले आहेत. शहरातील काही रस्त्यांना नदीचे स्वरूप आल्याने नागरिकांना दैनंदिन कामांसाठी बाहेर पडणे कठीण झाले आहे. काही भागात तर रस्त्यांनी नदीचे रूप धारण केले आहे. तालुक्यामधील सर्वच ओढ्या नाल्यांना पूर आला आहे
मलठण येथील लोहार गल्लीमध्ये वैजनाथ माने यांच्या घराची जुनी भिंत कोसळली.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र भिंतीच्या खाली उभी असलेली दुचाकी गाडीचे नुकसान झाले आहे शेजारील नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदत केली.
हवामान विभागाने आगामी दोन दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे व आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर न पडण्याचा सल्लाही दिला जात आहे.
या पावसामुळे तालुक्यातील फळबागा, पालेभाजी तसेच हंगामी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, शासनाकडून नुकसानभरपाईची मागणी सुरू झाली आहे.प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार कार्यालयाकडून करण्यात आले आहे.