फलटण चौफेर दि १२ मे २०२५
अवघ्या सात महिन्यांपूर्वी दि. ९ सप्टेंबर रोजी फलटण येथे नव्याने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कारभार सुरू झाला ९सप्टेंबर ते २०२४ ते ३१ मार्च २०२५ अखेर या कार्यालयाला विविध कारवाईपोटी २३ कोटी ५ लाख ५३ हजार ५४३ रुपयांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये आकर्षक नंबरापोटी १ कोटी ३१ लाख, तर वायूवेग पथकामार्फत केलेल्या कारवाईतून ३७ लाखांचा दंड वसूल केल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी सांगितले
राज्य शासनाच्या परिवहन विभागाने नव्याने फलटण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू केले आहे. १५ मार्च रोजी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते मात्र ९ सप्टेंबर २०२४ पासून प्रत्यक्ष कार्यालयाच्या कामकाजास प्रारंभ झाला.या परिवहन कार्यालयाच्या निगरानीखाली १ वायूवेग पथक कार्यरत आहे. हे पथक विविध मार्गावर तैनात करण्यात येत असून पथकातील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षकांमार्फत वाहनांची तपासणी केली जात आहे.
फलटण येथील कार्यालयात मोटार सायकल ५ हजार ८०८, स्कूटर १ हजार ३२०, टुरिस्ट टॅक्सी ३३५, अॅटो रिक्षा २३ अशा मिळून ७हजार ४८६ वाहनांची नव्याने नोंदणी एमएच ५३ खाली झाली आहे. १ हजार १५ वाहनांच्या आकर्षक नंबरमधून १ कोटी ३१ लाख ५७हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.वायूवेग पथकाने १ हजार १०२ वाहनांवर कारवाई केली असून या वाहनधारकांकडून ३७ लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ई- टॅक्समधून ३५ लाख ४९ हजार ७४९ रुपये मिळाले. एकरकमी कर व आयएमव्हीमधून १८ कोटी ८९ लाख १० हजार १४२ रुपयांचा महसूल मिळाला आहे.