रेल्वे घोडा गाडी ते सध्याचा ट्रॅक्टर,हार्वेस्टर असा तब्बल ९० वर्षात साखरवाडी कारखान्यात झालेल्या बदलाबाबतचा सविस्तर वृत्तांत...
साखरवाडी गणेश पवार
सुमारे ९० वर्षांपूर्वी साखरवाडीच्या भूमीत महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात पहीला खाजगी साखर कारखाना म्हणून साखरवाडीच्या कारखान्याची नोंद आहे. तत्कालीन प्रसिद्ध उद्योगपती तात्यासाहेब आपटे व त्यांचे दोन उद्योगपती सहकारी हिम्मतलाल कांतीलाल,अरविंद मफतलाल व यांनी त्याकाळी १० लाख रुपये भाग भांडवल एकत्रित करून या कारखानाची उभारणी केली होती त्यावेळी प्रतिदिन ४०० ते ५०० मॅट्रिक टन ऊसाचे गाळप हे वाफेच्या इंजनावर होत होते १९३३ साली उभारणीस सुरुवात झालेल्या या कारखान्याने ९ फेब्रुवारी १९३४ रोजी प्रत्यक्ष उत्पादन घेण्यास सुरुवात केली कारखान्याने कारखान्याने सुमारे अडीच हजार एकर जमीन भाडेतत्वावर घेतली होती. या परिसरातील ऊस वाहून नेण्यासाठी त्या काळात रेल्वे इंजिनला लँडीस जोडण्यात येत असत. रेल्वेबरोबरच कारखाना ऊस वाहतुकीसाठी घोडागाड्यांचा वापर करत होता
साखरवाडी कारखान्याने सरडे, सोनगाव, राजाळे, जिंती फलटण सर्कल, निंभोरे, होळ,रावडी, मुरुम या गावापर्यंत रेल्वे रुळ टाकले होते. या तोडलेला ऊस उचलण्यासाठी आणि तो रेल्वेच्या लँडीसमध्ये भरण्यासाठी अजस्त्र कैच्यांचा वापरही कारखान्याच्यावतीने करण्यात येत असे.
१९५० च्या आसपास मफतलाल व कांतीलाल हे दोन भागीदार साखरवाडी कारखान्यातुन बाहेर पडले. दोन भागीदार बाहेर पडल्याने तात्यासाहेब आपटे यांनी एक मिल व एका बॉयलरची कारखान्यात उभारणी करत गाळप क्षमता ८०० टिसीडीवर नेवून ठेवली. तात्यासाहेबानंतर कारखान्याची जबाबदारी माधवराव आपटे यांच्याकडे आली. सलग ३५ वर्षे कारखान्याचे व्यवस्थापन आणि मालकी हक्क माधवराव आपटे यांनी सांभाळले.
त्या काळात या कारखान्याचे सरव्यवस्थापक म्हणून बाळासाहेब आपटे हे कार्यरत होते. उपलब्ध क्षमता आणि त्यात वाढ करण्यासाठी माधवराव आपटे यांनी १९६४ साली जुना स्टीम डिव्हन प्लँट विजेच्या साहाय्याने कार्यान्वीत केला. यासाठी १२५० किलोवँट क्षमतेचा पॉवर टर्बाइन कारखाना परिसरात बसवण्यात आला. १९६० साली कारखान्याची गाळप क्षमता १३०० ते १४०० टीसीडी पर्यंत विस्तारली. नंतरच्या काळात शेतीमहामंडळही अनेक बाबींमुळे अडचणीत आले.
१९७९ च्या आसपास केंद्र व राज्य सरकारने या खासगी रेल्वे यंत्रणांकडे पाहिजे त्या प्रमानात लध न दिल्याने व मदत न केल्याने अहमदनगर जिल्ह्यातील टिळकनगर, वालचंदनगर येथील खासगी कारखान्यांच्या मालकीची रेल्वे यंत्रणा बंद पडली. कंपनीच्या मालकीची जमीन गेली, रेल्वे यंत्रणा बंद पडली, सरकारकडून मदत मिळेना आदी विविध कारणांमुळे १९८४ साली माधवराव आपटे यांनी साखरवाडी येथील खासगी साखर कारखाना कंपनी अँक्टनुसार चालविण्यास संमती दिली. १९८५ च्या आसपास या कारखान्याची सुत्रे तत्कालीन आमदार चिमणराव कदम यांनी सांभाळली.
यानंतरच्या काळात अनेक स्थित्यंतरे पाहात कारखान्याने आपली वाटचाल सुरु ठेवली. १९९१ ते २०१७ अखेर विष्णूपंत गाडे,हंबीरराव भोसले,शामराव भोसले, प्रल्हाद साळुंखे पाटील यांच्या चेअरमन पदाच्या कारकिर्दीत कारखाना १३५०,१८००,३१५० टीसीडी पर्यंत वाढवून पाच लाख टन गाळपापर्यंत उद्दिष्ट गाठले मात्र मागील स्थित्यंतराची पुनरावृत्ती होत सन १७/१८ चा हंगाम बंद राहिला यावेळी कामगार व शेतकऱ्यांनी विधान परिषदेचे सभापती विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना कारखाना पुनश्च सुरू करण्याबाबत साकडे घातले यावर श्रीमंत रामराजे यांच्या मार्गदर्शनाखाली साखर उद्योगातील अग्रगण्य कंपनी श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड एनसीएलटी न्यायालयातून हा कारखाना विकत घेतला विकत घेतल्यानंतर अवघ्या ४ वर्षात कारखान्याचे रुपडे पालटून ३ हजार ५०० टीसीडी क्षमतेचा कारखाना ७ हजार ५०० टीसीडीचा करून त्याच बरोबर डिस्टलरी, सह वीज निर्मिती, पीपी बॅग, रिफायनरी आधी सह उत्पादने वाढवून योगायोगाने कारखाना निर्मितीच्या ९० व्या वर्षात पदार्पण करीत असताना सर्वत्र टंचाई सदृश्य परिस्थिती व उसाची कमतरता असताना सुद्धा ऊसाचे चोख पेमेंट व अचूक वजन काट्याच्या जीवावर आज रोजी ७ लाख टन गाळपचा टप्पा पार केला आहे तसेच पुढचा संपूर्ण महिना पूर्ण क्षमतेने कारखाना चालवून ९ लाख टन गाळपाचा टप्प्या पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी सांगितले....!