फलटण चौफेर दि५ जुलै २०२५
सुरवडी (ता. फलटण) येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत यश मिळवून सेवेत निवड झालेल्या सहा क्लास वन अधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा दिमाखदार पद्धतीने पार पडला. यशदा संस्थेच्या फिल्ड स्टडी अंतर्गत सुरवडी गावाची निवड करण्यात आली असून, गावातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, कृषी, महसूल, अंगणवाडी इत्यादी क्षेत्रातील कामकाजाचा अभ्यास या अधिकाऱ्यांनी थेट गावात येऊन केला.
सत्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून साखरवाडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धनंजय साळुंखे पाटील हे उपस्थित होते. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित सर्व अधिकाऱ्यांचे स्वागत करत गावातील विविध योजनांमधील कामगिरीचे आणि २००१ मध्ये ग्राम स्वच्छता अभियानात मिळवलेल्या यशाचे सविस्तर माहिती सादर केली.
या अभ्यासदौऱ्यात धनंजय बांगर – उपजिल्हाधिकारी, आशिष दहातोंडे – पोलीस उपअधीक्षक,सायली पाटील – सहाय्यक राज्यकर आयुक्त,विशाल मुळे – शिक्षणाधिकारी,ललित मौले – सहाय्यक संचालक (वित्त व लेखा),राधिका चिमटे – बाल विकास प्रकल्प अधिकारी या अधिकाऱ्यांचे सुरवडी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरवडी व ग्रामस्थांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुषार जगताप, उपसरपंच सूर्यकांत पवार, पोलीस पाटील संतोष पवार, सोसायटी चेअरमन रणजीत साळवे, सदस्य काजल रिटे, सौ. साळुंखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांनी परिपाठात सहभाग घेतला असून, अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधत प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी धनंजय बांगर यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेबाबत आपली सकारात्मक भावना व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले.शाळेचे मुख्याध्यापक सतीश नलवडे यांनी प्रास्ताविक करत अधिकाऱ्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक अनिल कोळेकर यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मेहनतीचे, सचोटीचे आणि समाजसेवेचे महत्त्व समजावले.
सर्व अधिकाऱ्यांनी शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्र, महसूल कार्यालय, कृषी विभाग, पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यासोबत चर्चा करून गावातील सर्वांगीण विकास व धोरणांचा अभ्यास केला.दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांसोबत पोषण आहार घेत अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सहवासात वेळ घालवला आणि आनंदाने अनेक सेल्फीही घेतल्या. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामसेवक माने अण्णा, अमोल गोरे, सुरज घारगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका सौ. कुंभार मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.