साखरवाडी पुढारी वृत्तसेवा
फलटण तालुक्यातील ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, स्थानिक शेतकऱ्यांमध्ये यामुळे संतापाची लाट उसळली आहे. नुकतीच भिलकटी (ता. फलटण) गावातील निरा उजवा कालव्यालगत असलेल्या गणेश डीपी नामक शंभर केव्ही क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मर चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, भिलकटी गावातील निरा उजवा कालव्यालगत असणाऱ्या गणेश डीपी हा ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यामधील तेल (ऑइल) सांडून दिले व तांब्याच्या तारा चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत याआधीही मागील काही महिन्यांपासून फलटण तालुक्यातील शेतवस्ती, कालव्यालगतच्या शेकडो ट्रांन्सफार्मर चोरी झाल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. तरीही संबंधित प्रशासन आणि पोलीस विभाग यांच्याकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकरी व स्थानिक नागरिकांमधून होत आहे
या ट्रान्सफॉर्मर चोरीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी शेतीच्या कामावर प्रतिकूल परिणाम होत असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सुद्धा शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण होत आहे
स्थानिक नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की, ट्रान्सफॉर्मरची सुरक्षा व्यवस्था बळकट करावी, डीपीजवळ सीसीटीव्ही बसवावेत तसेच या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवावी.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चोरट्यांचे फावते असून, जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर या चोरीचे सत्र अधिकच गंभीर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.