फलटण चौफेर दि १२
फलटणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आ. दीपक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि संपूर्ण राजे गट दिनांक १४ रोजी उपमुख्यमंत्री अजितदादांची साथ सोडत खा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत हाती तुतारी घेणार आहे. तर आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सध्या तरी शांत राहणार असले तरी महायुतीचा प्रचार करणार नाहीत.
गेले अनेक दिवस आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण हे खासदार शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. महायुतीत असताना सुद्धा भाजपच्या नेतेमंडळी कडून होत असलेली अडवणूक व कार्यकर्त्यांना मिळत नसलेला सन्मान यामुळे पक्ष बदल करण्याचा दबाव कार्यकर्त्यांकडून नेते मंडळीवर होता. कार्यकर्त्यांच्या मनातील भावना आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कानावर घालून न्याय देण्याची मागणी सुद्धा केली होती मात्र दुर्लक्ष होत असल्याने आज श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची तातडीची बैठक होऊन त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण व विद्यमान जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि राजे गटाचे सर्व कार्यकर्ते यांनी दिनांक १४ रोजी खासदार शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती घेण्याचा निर्णय जाहीर केला. त्याला उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या गजरात जोरदार साथ दिली आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्ह्यामध्ये भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्याकडून होत असलेली अडवणूक, आरोप प्रत्यारोप तसेच कार्यकर्त्यांना मिळत नसलेला मान सन्मान याबाबतची खदखद व्यक्त करताना मनाने कार्यकर्त्यांच्या बरोबर आपण आहोत. संजीवराजेंच्या पाठीशी ठाम उभा राहणार आहे. सध्या तरी आपण महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट करताना शांत राहण्याची भूमिका जाहीर केली.