साखरवाडी ( गणेश पवार ) मोर्वे ता खंडाळा येथील गुरुकृपा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत तब्बल 2 कोटी 29 लाख 28 हजार 780 रुपयांचा अपहार झाला आहे . याप्रकरणी संस्थेचा सचिव , शाखाप्रमुख आणि पिग्मी एजंटावर खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सचिव सोमनाथ अशोक जाधव , शाखाप्रमुख सुषमा आकाश जगताप आणि पिगमी एजंट संदीप गोविंद जगताप ( सर्व रा . मोर्वे ता . खंडाळा ) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत . याबाबत लेखा परीक्षक रखमाजी आबाजी शेडगे यांनी फिर्याद दिली आहे . याबाबत मिळालेली माहिती अशी , संशयितांनी आपापसामध्ये संगनमताने कट करून संस्थेचे सभासद , खातेदार यांनी संस्थेमध्ये सोनेतारण करताना तसेच मुदत ठेव , दाम दुप्पट ठेव , आवर्त ठेव ठेवताना बोगस लाभांश , बोगस इलेक्ट्रिक खर्च , बोगस स्टेशनरी खर्च , बोगस कर्ज , बोगस हायपरचेस कर्ज , बोगस घरबांधणी कर्ज , बोगस मोर्गेज कर्ज करून ठेवीदार आणि खातेदारांची फसवणूक बोगस बँक भांडवल व इतर व्यवहारांमध्ये संगणकामध्ये फेरफार करून घोटाळा केला आहे . छोट्याशा संस्थेत तब्बल सव्वा दोन कोटींचा घोटाळा केल्यामुळे खंडाळा तालुक्यातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे . या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक महेश इंगळे करत आहेत .