फलटण चौफेर दि २२ ऑगस्ट २०२५
सिंहगड किल्ल्याच्या तानाजी कडा येथे हवा पॉइंटजवळील खोल दरीत पाय घसरून पडल्याने पर्यटक बेपत्ता झाला आहे. गौतम गायकवाड वय (२४, सध्या राहणार हैदराबाद, मूळ रा. फलटण, सातारा) असे बेपत्ता तरुणाचे नाव आहे. हैदराबाद येथून गौतमसह महेश शिंदे, हिमांशू शुक्ला, वैष्णवी आलगुडे, सूरज माळी असे ५ जण पुणे येथे फिरण्यासाठी बुधवारी दुपारी ४:३० वाजता आले. सायंकाळी तानाजी कड्याजवळ ते आले असता गौतम याने लघवीला जाऊन येतो, असे मित्रांना सांगितले.मात्र, बऱ्याच वेळानंतरही तो परत आला नाही. म्हणून मित्रांनी गौतम याचा शोध घेतला असता जवळच्याच हवा पॉइंटशेजारी त्याची चप्पल सापडली, मात्र तो दिसला नाही.सिंहगड भागात मुसळधार पाऊस असून, वाऱ्याचा वेगही जास्त आहे. त्यामुळे वाऱ्याचा व जमिनीचा अंदाज न आल्याने गौतम खोल दरीत को-सळला असावा असा अंदाज व्यक्त करुन मित्रांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
यानंतर आपत्ती व्यवस्थापन आणि पोलिस यांनी खोल दरीत जाऊन मुसळधार पाऊस, वाऱ्यात बेपत्ता गौतम याचा शोध घेतला, मात्र रात्रीच्या अंधारात तो आढळून न आल्याने रात्री ११ वाजता शोधकार्य थांबवले. आज सकाळी ६ वाजता पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.