फलटण चौफेर दि १८ जून २०२५
पुणे जिल्ह्यातील जेजुरी-बारामती रस्त्यावर श्रीराम ढाब्याजवळ आज संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात झाला. या अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, एका स्विफ्ट डिजायर कारने पिकअप टेम्पोला भरधाव वेगाने जोरदार धडक दिली. पिकअप टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा होता आणि त्यातून साहित्य उतरवले जात होते. त्याचवेळी कारचा चालक वेगावर नियंत्रण न ठेऊ शकता सरळ जाऊन पिकअपला जोरदार धडकला. कारने इतका जबर धक्का दिला की पिकअपमध्ये उभे असलेले व त्यातून साहित्य उतरवणारे कामगार काही फुटांवर फेकले गेले.
कारमधील तिघे प्रवासीही जागीच ठार झाले. पिकअपजवळ उभे असलेले व साहित्य उतरवत असलेले कामगार तसेच काही पादचारीही अपघातात मृत्यूमुखी पडले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सात पुरुष आणि एक महिला यांचा समावेश आहे.
या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामध्ये दोन लहान मुले, एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. सर्व जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच जेजुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. आपत्कालीन सेवा, 108 रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. पोलिसांनी कार आणि पिकअप ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.