फलटण चौफेर दि १७ मे २०२५
निरा देवघरच्या कामासाठी ९६४ कोटी रुपयाच्या टेंडरला शासनाने मंजूरी दिली. तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने सर्वात आनंदाची ही बाब आहे. यामुळे आता एका वर्षात निरादेवघरचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत खळाळेल, असा विश्वास माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर यांनी व्यक्त केला आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कोळकी येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते रणजितसिंह ना. निंबाळकर म्हणाले, खोट्या घोषणा, खोटी टेंडर काढता म्हणणाऱ्या विरोधकांसाठी ९६४ कोटीचे शासनाने मंजूर केलेले टेंडर ही मोठी चपराक आहे आता तरी विरोधकांनी माहिती घ्यावी चौकशी करून बोलावे. निवडणुकीत दिलेली विकासकामांची आश्वासने पूर्ण करणारच. फलटण तालुक्याला आता जे पाणी मिळत आहे त्यातील तांब्याभरही पाणी कमी होणार नाही. पाणी कमी करण्याचा अधिकार मंत्रिमंडळालाही नाही. विरोधकांच्या भूलथापांना कोणीही बळी पडू नका.
आ. सचिन पाटील म्हणाले, आपल्यापेक्षा कर्नाटक आंध्रला लवादातून जास्तीचे पाणी मिळाले.आपणाला ही त्या राज्याइतकेच सुमारे २०० टीएमसी पाणी मिळायला हवं होतं. राज्याला जास्तीचे पाणी मिळवून द्यायला तुम्ही कमी पडला. तुम्ही संघर्ष न केल्याने तालुक्याचे नुकसान झाले. खरंतर त्या नुकसानीस तुम्हीच जबाबदार आहात. २३ वर्षे पाणी अडवूनही ते तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आणू शकला नाही. येत्या एक दीड वर्षात ते पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आम्ही पोहोचवणार असल्याचे त्यांनी सांगितले